Welcome to Khabar 24 Live   Click to listen highlighted text! Welcome to Khabar 24 Live
E-Paperसामाजिक

“तपोवन पहा – तपोवन वाचवा” ही हाक देत पर्यावरण रक्षणासाठी सर्व स्तरांतील नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन.

नाशिक प्रतिनिधी : तपोवन वाचवा चे याचिकेकर्ते नितिन पंडित यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक.

तपोवन परिसरातील सुमारे १७०० झाडांच्या संरक्षणाच्या प्रश्नावर उच्च न्यायालय व राष्ट्रीय हरित लवाद (NGT) येथे अनुक्रमे १२ व १९ जून रोजी होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणप्रेमींची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी तपोवन येथे पार पडली. बैठकीस तपोवन वाचवा याचिकेचे याचिकाकर्ते ॲड. नितीन पंडित उपस्थित होते.

बैठकीत तपोवन परिसरातील वृक्षसंवर्धन, आगामी न्यायालयीन प्रक्रिया, जनआंदोलनाची दिशा आणि पुढील रणनीती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. येत्या काळात तपोवनातील झाडांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय अपेक्षित असल्याने पर्यावरणप्रेमींनी व्यापक जनजागृती आणि लोकसहभाग वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला.

तपोवन वाचवा चळवळीला नाशिक शहर, नाशिक जिल्हा तसेच देश-विदेशातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. विविध पर्यावरणवादी संस्था, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, नागरिक तसेच प्रसारमाध्यमांनी हा विषय व्यापक पातळीवर पोहोचविल्यामुळे चळवळीला मोठी बळकटी मिळाली असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

बैठकीत येत्या काळात तपोवनातील हिरवागार परिसर, वृक्षसंपदा आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी पुन्हा व्यापक जनचळवळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर १७ जून २०२६ पासून नागरिकांनी तपोवन परिसराला भेट देऊन तेथील वृक्षसंपदा आणि नैसर्गिक सौंदर्य प्रत्यक्ष पाहावे तसेच तपोवन वाचविण्यासाठी शासनापर्यंत जनभावना पोहोचवाव्यात, असे आवाहन करण्यात आले.

विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक समूहांनी या पर्यावरण संरक्षणाच्या लढ्यात सक्रिय सहभाग घ्यावा, यासाठी व्यापक संपर्क मोहीम राबविण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.

“तपोवन पहा – तपोवन वाचवा” ही हाक देत पर्यावरण रक्षणासाठी सर्व स्तरांतील नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!