
बाळाच्या आयुष्यातील पहिली पायरी… शाळा निवडताना पालकांनी काय विचार करावा?
“शाळा” हा शब्द उच्चारला की डोळ्यांसमोर येते ती एका छोट्याशा हातात धरलेली पाण्याची बाटली… पाठीवरची छोटी बॅग… डोळ्यांत कुतूहल… आणि आई-वडिलांच्या मनात दाटलेली काळजी…
बाळाच्या आयुष्यातील पहिली शाळा म्हणजे केवळ शिक्षणाची जागा नसते; ती त्याच्या व्यक्तिमत्त्वाची पहिली कार्यशाळा असते.
इथेच तो पहिल्यांदा घराबाहेरच्या जगाला भेटतो…
इथेच त्याच्या मनावर संस्कारांचे पहिले रंग उमटतात…
आणि इथूनच सुरू होतो त्याच्या आयुष्याचा शैक्षणिक, सामाजिक आणि भावनिक प्रवास…
म्हणूनच “शाळा निवड” हा केवळ प्रवेशाचा विषय नसून, तो आपल्या मुलाच्या भविष्याचा पाया रचण्याचा निर्णय असतो.
१. शाळेची भव्य इमारत नव्हे… वातावरण महत्त्वाचे
आज अनेक शाळा आकर्षक जाहिराती, एसी वर्गखोल्या, डिजिटल बोर्ड, मोठे कॅम्पस यांचा गाजावाजा करतात. पण पालकांनी स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे— _“ही शाळा माझ्या मुलाला माणूस म्हणून घडवेल का?”_
शाळेचे वातावरण प्रेमळ, सुरक्षित आणि मुलाभिमुख असणे सर्वात महत्त्वाचे आहे.
लक्षात ठेवा—
■ भीतीत वाढलेले मूल कधीच आत्मविश्वासी होत नाही.
■ सततच्या दडपणात शिकलेले मूल आनंदाने शिकत नाही.
आणि
■ फक्त गुणांसाठी धावणारे शिक्षण आयुष्य घडवत नाही.
शाळा अशी असावी—
जिथे मुलाला प्रश्न विचारण्याची मोकळीक असेल,
चूक केल्यावर अपमान नव्हे तर मार्गदर्शन मिळेल,
आणि प्रत्येक मुलाला “स्पर्धक” नव्हे तर “व्यक्तिमत्त्व” म्हणून पाहिले जाईल.
२. पहिला संस्कार — शिक्षणाची भीती नव्हे, गोडी निर्माण व्हावी
लहान वयात मुलांवर अभ्यासाचे ओझे टाकणे ही मोठी चूक ठरू शकते.
पहिल्या शिक्षणात महत्त्वाचे काय?
👉🏻 अक्षरांपेक्षा आनंद,
👉🏻 पुस्तकांपेक्षा अनुभव,
आणि
👉🏻 पाठांतरापेक्षा जिज्ञासा.
जर शाळा पहिल्या दिवसापासूनच—
होमवर्कचा ताण,
स्पर्धेचे दडपण,
आणि
गुणांची भीती देत असेल, तर मूल शिक्षणापासून दूर जाऊ शकते.
उलट,
गोष्टी,
गाणी,
खेळ,
चित्रकला,
संवाद,
आणि अनुभवातून शिकवणारी शाळा मुलाच्या मनात शिक्षणाची गोडी निर्माण करते.
३. शिक्षक कसे आहेत ? – हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न
शाळेची खरी ओळख तिच्या शिक्षकांमधून दिसते.
पालकांनी प्रवेशापूर्वी शिक्षकांविषयी जाणून घ्यावे—
★ ते मुलांशी कसे बोलतात?
★ मुलांच्या चुका कशा हाताळतात?
★ प्रत्येक मुलाकडे समान नजरेने पाहतात का?
★ मुलांना घाबरवतात की प्रोत्साहन देतात?
लक्षात ठेवा- _“लहान मुलांच्या मनावर शिक्षकांचे शब्द आयुष्यभर कोरले जातात.”_
_एक प्रेमळ शिक्षक एखाद्या मुलाचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो._
४. शाळामुलाच्याबालपणाचाआदर करते का?
आज काही शाळांमध्ये अगदी लहान वयातच मुलांना स्पर्धेच्या रेसमध्ये उभे केले जाते.
पण प्रत्येक मूल वेगळे असते—
कोणाला चित्रकला आवडते,
कोणाला नृत्य,
कोणाला विज्ञान,
तर कोणाला फक्त खेळण्यातून शिकायला आवडते.
चांगली शाळा तीच— जी मुलाला “साच्यात” बसवण्याचा प्रयत्न करत नाही,
तर त्याच्या नैसर्गिक गुणांना फुलू देते.
५. भाषेचा प्रश्न — मातृभाषेचा पाया महत्त्वाचा अनेक पालक “इंग्रजी माध्यम” या आकर्षणामुळे घाईघाईने निर्णय घेतात.
परंतु मानसशास्त्र सांगते की, मूल ज्या भाषेत विचार करू शकते, त्या भाषेत ते उत्तम शिकते.
म्हणून—
सुरुवातीच्या शिक्षणात मातृभाषेचा मजबूत पाया असणे अत्यंत आवश्यक आहे.
इंग्रजी शिकणे महत्त्वाचे आहेच; पण मातृभाषा हरवून नव्हे.
मुलाला भाषा शिकवण्यापेक्षा आत्मविश्वास देणे अधिक महत्त्वाचे आहे.
६. सुरक्षितता आणि स्वच्छता — तडजोड नको
शाळा निवडताना खालील गोष्टी प्रत्यक्ष पाहाव्यात—
● वर्गखोल्यांची स्वच्छता,
● स्वच्छ शौचालये,
● सुरक्षित पिण्याचे पाणी,
● सीसीटीव्ही आणि सुरक्षा व्यवस्था,
● मुलांना आणणे-नेणे याची पद्धत,
● शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वर्तन.
कारण पालकांची सर्वात मोठी शांती म्हणजे— “माझे बाळ सुरक्षित आहे” ही भावना.
७. फक्त निकाल नव्हे… संस्कार महत्त्वाचे
खरी शाळा तीच— जी मुलाला फक्त डॉक्टर, इंजिनिअर किंवा अधिकारी बनवत नाही;
तर चांगला माणूस बनवते.
शाळेतून मुलाला शिकायला मिळावे—
नम्रता,
शिस्त,
सहकार्य,
संवेदनशीलता,
पर्यावरणप्रेम,
मोठ्यांचा आदर,
आणि समाजाबद्दलची जाणीव.
कारण आयुष्यात फक्त हुशारी पुरेशी नसते; माणुसकीही लागते.
८. पालकांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची
फक्त चांगली शाळा पुरेशी नसते.
पालकांनीही काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात—
◆ मुलांची तुलना करू नका
“शेजारचा मुलगा एवढा हुशार…”
अशा तुलना मुलांचा आत्मविश्वास तोडतात
गुणांपेक्षा प्रयत्नांचे कौतुक करा.
◆ प्रत्येक वेळी पहिला क्रमांक महत्त्वाचा नसतो; शिकण्याची इच्छा महत्त्वाची असते.
मुलांशी संवाद ठेवा
दररोज विचारा—
“आज शाळेत काय नवीन शिकलास?”
“आज तुला कोणती गोष्ट आवडली?”
शिक्षणाला शिक्षा बनवू नका
अभ्यास म्हणजे आनंदाचा प्रवास असावा; भीतीचा नव्हे.
९. प्रवेश घेताना पालकांनी विचारावेत असे काही महत्त्वाचे प्रश्न
◆ शाळेची शिक्षणपद्धती कशी आहे?
◆ मुलांवर अभ्यासाचा ताण किती असतो?
◆ खेळ, कला, संगीत यांना किती महत्त्व दिले जाते
◆ शिक्षकांचे प्रशिक्षण कसे आहे?
◆ पालक-शिक्षक संवाद किती नियमित असतो?
◆ मुलांच्या भावनिक विकासासाठी काय उपक्रम आहेत?
◆ स्क्रीन टाइम किती आहे?
◆ मुलांच्या वैयक्तिक क्षमतेकडे लक्ष दिले जाते का?
बाळाच्या आयुष्यातील पहिली शाळा म्हणजे त्याच्या भविष्यातील पहिली दिशा असते.
त्या छोट्याशा हाताला धरून जेव्हा आपण त्याला शाळेच्या दारापर्यंत घेऊन जातो, तेव्हा आपण फक्त प्रवेश घेत नसतो…
तर त्याच्या स्वप्नांच्या प्रवासाची सुरुवात करत असतो.
म्हणून शाळा निवडताना— भव्य इमारतींपेक्षा प्रेमळ वातावरण निवडा…
मोठ्या जाहिरातींपेक्षा चांगले शिक्षक निवडा…
आणि फक्त गुण देणारी नव्हे, तर आयुष्य घडवणारी शाळा निवडा…
कारण…
“शिक्षणाची खरी सुरुवात पुस्तकातून होत नाही…
ती होते प्रेम, संस्कार आणि विश्वासातून…”
लेखक :- डॉ. दिलीप कोठावदे, जेष्ठ पत्रकार, नाशिक मो.9657562911




