महापालिकेची वर्षभर डोळेझाक; अखेर नागरिकांनीच रस्त्यावर मारले पांढरे पट्टे!
‘अखिल भारती नगर मित्र मंडळ ट्रस्ट' चा पुढाकार

पुणे शहर : भारतीनगर येथील मेन रोडवर मागील वर्षी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांनी पुणे महानगरपालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतर संबंधित रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले. मात्र, डांबरीकरण करताना रस्त्याच्या मूळ लेव्हलपेक्षा डांबराचा थर अधिक उंच राहिल्याने हा भाग वाहनचालकांसाठी धोकादायक ठरला.

डांबरीकरणानंतर सदर रस्त्याची लेव्हल पूर्ववत करावी किंवा वाहनचालकांना धोकादायक भागाची कल्पना यावी यासाठी त्याठिकाणी पांढरे पट्टे मारावेत, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने करण्यात आली. तब्बल वर्षभर नागरिकांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करूनही या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या कालावधीत या ठिकाणी अनेक वेळा अपघात घडूनही प्रशासनाला जाग आली नाही, अशी नागरिकांची नाराजी आहे. अखेर महापालिकेच्या कारवाईची प्रतीक्षा न करता अखिल भारती नगर मित्र मंडळ ट्रस्ट च्या वतीने काल रात्री संबंधित धोकादायक ठिकाणी स्वतःहून पांढरे पट्टे मारण्यात आले.
महापालिकेने रस्ते दुरुस्तीची कामे करताना केवळ डांबरीकरण करून न थांबता रस्त्याची योग्य लेव्हल, सुरक्षितता आणि वाहनचालकांच्या सोयीचा विचार करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
‘महापालिकेने करायचे काम नागरिकांनाच करावे लागते का?’ असा संतप्त सवालही यानिमित्ताने भारतीनगर परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.




