अत्याधुनिक रोबोटिक मशिनद्वारे नालेसफाई

अत्याधुनिक रोबोटिक मशिनद्वारे नालेसफाई
नवीन नाशिक प्रतिनिधी : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग २५ मधील नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेला प्राधान्य देत नगरसेविका कविता नाईक यांनी मनपाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांमुळे श्रीरामनगर, मोती चौक, काळेश्वर चौक, उदय कॉलनी, खांडे मळा तसेच हेडगेवार स्मशानभूमी परिसरातील विविध नाल्यांच्या साफसफाईच्या कामांना वेग प्राप्त झाला आहे. विशेषतः हेडगेवार स्मशानभूमी परिसरातील मुख्य नाल्याच्या साफसफाईसाठी एकमेव अत्याधुनिक रोबोटिक मशिन तैनात करण्यात आले आहे.
या परिसरातील क्रॉस व मुख्य नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, पालापाचोळा, प्लास्टिक आणि झाडझुडपे साचल्याने पाण्याचा प्रवाह बाधित झाला होता. काही ठिकाणी दूषित पाणी साचून राहिल्याने दुर्गंधी, डासांचा वाढता प्रादुर्भाव आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. रहिवाशांनी या समस्येबाबत तक्रार केल्यानंतर नगरसेविका नाईक यांनी तातडीने अभियंत्यांची भेट घेऊन व कर्मचाऱ्यांना स्थळीच निर्देश देऊन समस्येचे गांभीर्य समजावून सांगितले.
त्यांच्या या पाठपुराव्यामुळे संबंधित विभागाने त्वरित कार्यवाही करत नाल्यांच्या साफसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू केली आहेत. रोबोटिक मशिनच्या सहाय्याने नाल्यातील गाळ व इतर अडथळे काढून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्याचे काम वेगाने सुरू आहे.




