Welcome to Khabar 24 Live   Click to listen highlighted text! Welcome to Khabar 24 Live
E-Paperमहाराष्ट्रयुवासामाजिक

ढोल-ताशा वाद्यसंस्कृती’वरील जगातील पहिल्या पुस्तकाचे नाशिकमध्ये दिमाखदार प्रकाशन

सांस्कृतिक इतिहासात सुवर्णपान

नाशिक : महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा आणि ढोल-ताशा वाद्यसंस्कृतीचा गौरवशाली इतिहास उलगडणाऱ्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार आज नाशिक शहर ठरले. ढोल-ताशा ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग असून, या वाद्यसंस्कृतीचा इतिहास, परंपरा आणि बदलते स्वरूप यांचा सखोल वेध घेणाऱ्या आणि ‘ढोल-ताशा वाद्यसंस्कृतीवर आधारित जगातील पहिले व एकमेव’ ठरलेल्या पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा नाशिक येथील गंगापूर रोडवरील हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानात मोठ्या उत्साहात पार पडला.

या सोहळ्यास नाशिकमधील सर्व पारंपारिक ढोल-ताशा पथकांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उदघाटन व पुस्तक प्रकाशन लेखक प्रितम भामरे यांचे आई-वडील, खासदार मा. श्री. राजाभाऊ वाजे, नगरसेवक तथा गटनेते मा. श्री. अजय दादा बोरस्ते, नाशिकच्या प्रथम ‘शिवसंस्कृती’ ढोल-ताशा पथकाचे प्रमुख श्री. अरुण दादा मुंगसे, तसेच नाशिक जिल्हा ढोल-ताशा समितीचे अध्यक्ष श्री. सर्जेराव वाघ यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

मान्यवरांचे मनोगत व कौतुक:

खासदार राजाभाऊ वाजे: ढोल-ताशा संस्कृतीवर जगातील हे पहिलेच पुस्तक असल्याबद्दल लेखकाचे कौतुक केले. भविष्यात वाद्यसंस्कृतीचे हे रूप असेच अक्षरग्रंथात उतरावे आणि या पुस्तकाच्या पुढील आवृत्त्या वाचकांना वाचायला मिळाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नगरसेवक अजय दादा बोरस्ते – हे पुस्तक म्हणजे वाद्यसंस्कृतीवरील जगातील पहिला ऐतिहासिक दस्तऐवज आहे. लेखकाच्या मेहनतीचे कौतुक करतानाच, हा वारसा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा यासाठी पुस्तकाचे इंग्रजीत भाषांतर व्हावे, अशी संकल्पना त्यांनी मांडली.

पथक प्रमुख अरुणजी मुंगसे (गुरु) : “कॉलेजमधील विद्यार्थी ते लेखक प्रितम” असा प्रवास जवळून पाहिल्याच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. गुरू-शिष्याच्या नात्याला उजाळा देत, “शिष्याच्या कार्याचे फळ गुरूच्या हस्ते मिळणे हीच आयुष्यातील मोठी गरुडझेप आहे,” अशा शब्दात त्यांनी प्रितमला उदंड शुभेच्छा दिल्या.

सर्जेराव वाघ (अध्यक्ष, नाशिक जिल्हा ढोल-ताशा समिती) : नाशिकच्या कलाकाराने साकारलेले हे पुस्तक संपूर्ण जगभरात पोहोचेल, हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. नाशिकची ढोल-ताशा समिती प्रितमच्या प्रत्येक कार्यात सदैव पाठीशी उभी राहील, असा विश्वास त्यांनी दिला.

लेखक प्रितम भामरे यांचा भावूक प्रवास :

मनोगत व्यक्त करताना लेखक प्रितम भामरे यांनी सांगितले की, २०१८ मध्ये पथक प्रमुख म्हणून त्यांनी लिहिलेला एक लेख प्रचंड व्हायरल झाला होता, तिथूनच या पुस्तकाचे बीज रोवले गेले. १५ वर्षे ढोल-ताशा क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभवानंतर, २०२५ च्या गुरुपौर्णिमेला त्यांनी प्रत्यक्ष लेखनाला सुरुवात केली आणि २०२६ च्या गुरुपौर्णिमेला एक वर्षाच्या सखोल अभ्यासानंतर हे पुस्तक पूर्ण झाले. आपल्या १६ वर्षांच्या अनुभवातून हे पुस्तक साकारताना आई-वडील आणि मार्गदर्शकांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले.

पुस्तकाचा प्रवास व श्रेय नामावली :

पहिले दर्शन: ढोल-ताशाची पंढरी असलेल्या पुण्यातील ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात’ या पुस्तकाचे पहिले प्रकाशन/अर्पण करण्यात आले होते. त्यानंतर लेखकाची कर्मभूमी असलेल्या नाशिकमध्ये हा मुख्य सोहळा पार पडला.

सूत्रसंचालन: जयेश क्षेमकल्याणी

मुखपृष्ठ: श्रीकांत नलावडे

मुद्रक: सरस्वती एजन्सी (श्री. अभिराम कासार)

कार्यक्रमास ढोल-ताशा क्षेत्रातील सर्व कलाकार, मित्रपरिवार, गुरुजन, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर आणि रसिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्तीने ओतप्रोत अशा ‘वंदे मातरम्’ गीताच्या सादरीकरणाने या ऐतिहासिक सोहळ्याची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!