“गणपती बाप्पा.. तपोवन वाचवा” देवरे परिवाराकडून आर्त हाक
गणेशोत्सवानिमित्त तपोवन वाचविण्याचा सामाजिक संदेश

नवीन नाशिक : घरगुती गणेशोत्सवात प्रत्येकवर्षी सामाजिक संदेश देत देवरे परिवाराकडून आरस तयार करण्यात येत असते. यावर्षी श्रीगणेश स्थापना करून तपोवन वाचविण्याची विनवणी करणारे आरस तयार केले असून पर्यावरण प्रेमींकडून कौतुक होतं आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील कित्येक वर्ष जुने वृक्ष कापण्याचा घाट प्रशासनाकडून करण्यात येत असतांना अनेक सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते पुढे सरसावले त्यासाठी समित्या स्थापन झाल्या पुढे हा लढा न्यायालयात गेला आणि अजूनही निकालाच्या प्रतीक्षेत आहे.

या प्रकरणाची दखल घेत नाशिककर जनतेची जनजागृती करण्यासाठी आणि हा लढा जिंकण्यासाठी देवरे परिवाराकडून आपल्या राहत्या घरी पाच दिवसीय गणेशोत्सवात श्रीगणेशाला तपोवन वाचवण्याची प्रार्थना करण्यात येणार आहे.
बुद्धीची देवता असणारे श्रीगणेश प्रशासनाला बुद्धी देवो आणि नाशिकचा जीव वाचवो असे मत नितिन देवरे यांनी व्यक्त केले.




