खबर ‘प्रेरणादायी’ : एव्हरेस्ट बेस कॅम्पला ‘सागराचे’ दर्शन.
दृष्टीदोष असूनही एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम यशस्वी.

प्रेरणादायी यशोगाथा : दृष्टीदोष असूनही एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम यशस्वी.
नाशिक च्या सागर बोडके ची एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी चढाई.
दृष्टीदोष हा अडथळा नसून जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण नाशिकचे सागर बोडके आणि मुंबईचे अजय लालवानी यांनी घालून दिले आहे. दोघांनीही एव्हरेस्ट बेस कॅम्प गिर्यारोहण मोहीम यशस्वीपणे पूर्ण करून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
नाशिक येथील रहिवासी सागर बोडके यांना 75 टक्के दृष्टीदोष असून ते बँक ऑफ इंडिया येथे क्लर्क म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे मित्र अजय लालवानी हे मुंबईचे रहिवासी असून ते 100 टक्के दृष्टीहीन आहेत. अजय लालवानी बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यरत आहेत.
31 जानेवारी 2026 रोजी दोघांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठण्याचा निर्धार केला. “बिकट एडवेंचर्स” या संस्थेमार्फत मोहिमेचे नियोजन करण्यात आले. या मोहिमेत अजित मोरे सर यांचाही सहभाग होता.
मोहीमेपूर्वी दोघांनी कठोर शारीरिक तयारी केली. मुंबईमध्ये अजय लालवानी आणि अजित मोरे यांनी सराव सुरू ठेवला, तर सागर बोडके यांनी नाशिक येथे डॉक्टर मुस्तफा टोपीवाला यांच्या मार्गदर्शनाखाली सायकलिंग, रनिंग, जिम आणि गुरुवर्य राजेंद्र निंबाळते यांच्यासोबत स्विमिंगचा सराव केला. सायकलिंग दरम्यान पायलट म्हणून अविनाश शिरसागर आणि श्रीराम पवार यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
14 एप्रिल 2026 रोजी टीमने मुंबईहून दिल्लीमार्गे नेपाळकडे प्रयाण केले. 17 एप्रिल रोजी ते काठमांडू येथे पोहोचले. तेथे मुंबईहून आलेले स्वप्निल देसाईही टीममध्ये सहभागी झाले. त्यानंतर आठ जणांची टीम एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहिमेसाठी सज्ज झाली.
18 एप्रिल रोजी गाईड्ससोबत चर्चा करून अंतिम तयारी करण्यात आली. 20 एप्रिल रोजी लुकला एअरपोर्टपासून ट्रेकची सुरुवात झाली. फाकडिंग, नामचे बाजार, टेंगबोचे, लोबोचे आणि गोरख शेप या मार्गांवरून प्रवास करत टीमने 26 एप्रिल 2026 रोजी एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठत मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली.
या प्रवासादरम्यान अत्यंत थंडी, दगडी वाटा, लोखंडी पूल, उंच चढाई, बदलते हवामान आणि कमी ऑक्सिजन यांसारख्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. स्थानिक गाईड नरेश यांच्या मार्गदर्शनामुळे ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करता आली.
सागर बोडके यांनी ही मोहीम आपल्या आई-वडील, गुरुजन, पत्नी आणि मदत करणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींना समर्पित केली आहे. भविष्यात आणखी साहसी मोहिमा करण्याची त्यांची इच्छा आहे.
या मोहिमेसाठी अनेक संस्था व व्यक्तींनी सहकार्य केले. तर काहींनी आश्वासन दिले आहे त्यामध्ये
स्थानिक आमदार श्री हिरामण कोसकर ,
रोटरी क्लब ऑफ मुंबई निओ,
नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंड, युनिट महाराष्ट्र नाशिक
बिइंगअप फाऊंडेशन मुंबई,
समर्थ व्यायाम मंदिर दादर. मुंबई.
नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड जिल्हा शाखा नाशिक.
RC Education Nashik,
सक्षम नाशिक,
गरुड झेप प्रतिष्ठान नाशिक,
यांचा समावेश आहे.
गरुड झेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संदीप भानोसे यांनी सागर बोडके व अजय ललवाणी दोघांचे मनापासून अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
ही यशोगाथा दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींना नव्या उंचीवर झेप घेण्यासाठी प्रेरणा देणारी ठरत आहे.




