Welcome to Khabar 24 Live   Click to listen highlighted text! Welcome to Khabar 24 Live
E-Paperदेशधर्म

डॉ. सुरेश हावरे यांची अयोध्येतील श्री रामजन्मभूमी ट्रस्टचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्यासंबंधीच्या समितीवर नियुक्ती

श्री  राममंदिर, व्यवस्थापन आणि विश्वास…

श्री  रामजन्मभूमी ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निवड समितीवर डॉ. सुरेश हावरे यांची नियुक्ती झाल्यानंतर, ज्येष्ठ पत्रकार ‘साईलीला’ मासिकाचे वरिष्ठ संपादक भगवान दातार यांनी लिहिलेला हा विशेष लेख.

रामभक्तांच्या अपेक्षा, डॉ. हावरे यांचे कार्य आणि मंदिर व्यवस्थापनातील त्यांचे योगदान यावर आधारित हे मनोगत वाचनीय आहे.

🖋️ लेखक : श्री. भगवान दातार
वरिष्ठ संपादक, साईलीला मासिक
bhagwandatar@gmail.com

👇 संपूर्ण लेख खाली वाचा.

आश्वासक नियुक्ती

अयोध्येतील श्री रामजन्मभूमी ट्रस्टचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्यासंबंधीच्या समितीवर डॉ. सुरेश हावरे यांची नियुक्ती झाल्याची घोषणा सोमवारी झाली आणि राम मंदिराबाबतच्या काळजीने सैरभैर झालेल्या भारतीयांना एक दिलासा मिळाला.

मुंबईतील प्रख्यात बांधकाम व्यावसायिक आणि अणुशास्त्रज्ञ म्हणून सा-या देशाला परिचित असणारे डॉ. हावरे शिर्डीच्या साई संस्थानचे अध्यक्ष होते आणि त्यांची ती कारकिर्दही अतिशय लखलखीत होती. साई समाधी शताब्दी वर्ष त्यांच्या कारकिर्दीतच पार पडले. कुशल नेतृत्व, कल्पक नियोजन, आणि देखणे आयोजन यामुळे तो सोहळा देशातच नव्हे तर जगभरात नावाजला गेला. महामहीम राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी या सोहोळ्यातच शिर्डीला भेट देऊन डॉ. हावरे यांच्या कल्पक नियोजनाचे आणि शिर्डीत त्यांनी राबवलेल्या विविध योजनांचे कौतुक केले होते. स्वच्छ आणि पारदर्शी कारभार हे डॉ. हावरे यांचे आणखी एक वैशिष्य. शिर्डीत रोज दर्शनासाठी येणा-या सरासरी ८० हजार भाविकांची चोख व्यवस्था राखण्याबरोबरच त्यांनी सस्थानचे प्रसादालय, अद्ययावत रुग्णालय, शिक्षण संकुल, अद्ययावत दर्शनरांग, सुमारे २० हजार जणांची सोय होईल अशी निवास व्यवस्था, रक्तदानाची मोहीम, भक्तांना मंदिरात सेवेची संधी देणारी योजना, आकाशवाणी, एफ. एम. रेडिओ, विमानतळ यांचा विकास, स्वच्छ शिर्डीची मोहीम, जगातल्या साईभक्तांना एकत्र आणण्याची योजना असे एक ना अनेक उपक्रम राबवले आणि यशस्वी करुन दाखवले.

विदर्भातील एका खेड्यातून मुंबईत आलेले सुरेश हावरे भाभा अणुशक्ती केंद्रात २७ वर्ष संशोधक होते. त्यानंतर बांधकाम क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला.

एकदा ते शिर्डीत दर्शनासाठी गेले असतांना तिथली अव्यवस्था व गुंडगिरी पाहून यापुढे शिर्डीत कधीच येणार नाही असं त्यांनी ठरवलं होतं. पण अचानक त्यावेळचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचा फोन आला आणि त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी संस्थानच्या अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतली आणि कमालीची यशस्वी करुन दाखवली.

मंदिर या विषयाचा डॉ. हावरे यांचा विशेष अभ्यास आहे. ‘मंदिर व्यवस्थापन’ या विषयावर त्यांनी अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिलं आहे. मंदिरांमध्ये देशाला चैतन्य देणारी ऊर्जा तर आहेच , पण या मंदिरांमध्ये प्रचंड रोजगार आहे. व्यवस्थापनाची 5 M या नावाने ओळखली जाणारी Man, Machine, Material, Market and Money ही पाचही तत्वे मंदिर व्यवस्थापनाला लागु होतात. त्यानुसार भारतातील मंदिरे स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त, भक्ताभिमुख आणि समाजोपयोगी बनली पाहिजेत असा डॉ. हावरे यांचा ध्यास आहे. त्यांचे हे पुस्तक अनेक विद्यापीठांनी अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहे. या विषयाचा एम. बी. ए. अभ्यासक्रम सुरु झाला पाहिजे असा त्यांचा प्रयत्न आहे.

मंदिरांविषयी आस्था असलेला व हिंदुत्वावर असीम श्रध्दा असलेला एक तळमळीचा शास्त्रज्ञ या समितीवर आला ही नक्कीच आनंददायी बाब आहे. अमरनाथ मंदिराच्या व्यवस्थापन मंडळावरही ते कार्यरत आहेत.
माझ्या दृष्टीने आनंदाची बाब म्हणजे डॉ. हावरे यांचा सहवास मला अनेक वर्ष लाभला आहे. ते शिर्डी संस्थानचे अध्यक्ष असतांना त्यांनीच माझी संस्थानच्या ‘साईलीला’ या मासिकासाठी कार्यकारी संपादक म्हणून निवड केली. श्री साईंच्या कृपेने ती जबाबदारी मी आजही सांभाळत आहे. डॉ. हावरे यांची ‘Temple Management’, ‘In Service of Sai’, ‘BARC Days’ , ‘Sai Way’ , ‘शिदोरी’, ‘उद्योग संपदा’, ‘उद्योग तुमचा पैसा दुस-याचा’ ही पुस्तकं प्रसिध्द झाली आहेत. योगायोगाने या प्रत्येक पुस्तकासाठी अनुवाद किंवा संपादन सहाय्य करण्याची संधी मला मिळाली आहे.
डॉ. हावरे यांच्यामुळे सर्व रामभक्तांना नक्कीच दिलासा मिळेल.
– भगवान दातार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!