“तोडलेल्या वृक्षाला अजून किती वेदना देणार?” – अमित कुलकर्णी
"नियमांचे पालन नागरिकांनीच करायचे का?" "संवर्धनाच्या नावाखाली वृक्षांचा छळ थांबवा!"

नाशिक : गंगापूर रोड परिसरातील वडाच्या झाडांना दोरीने बांधलेल्या बॅनर्समुळे होणाऱ्या हानीबाबत तात्काळ कारवाईची मागणी निसर्ग सेवक अमित कुलकर्णी आणि समस्त पर्यावरणसेवकांकडून केली जात आहे.
नाशिक शहरातील गंगापूर रोड परिसरात असलेल्या जुन्या वडाच्या झाडांवर मोठ्या प्रमाणावर बॅनर्स/पोस्टर्स दोऱ्यांनी बांधले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे, संबंधित स्थळावर लावलेल्या बॅनरवर नाशिक महानगरपालिकेचे चिन्ह (लोगो) स्पष्टपणे दिसत आहे, ज्यामुळे हा बॅनर महानगरपालिकेमार्फत किंवा त्यांच्या संबंधित उपक्रमांतर्गत लावण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गंगापूर रोड, रमेश्वर नगर येथील तोडलेल्या वडाच्या झाडाला दोरीने घट्ट बांधलेला बॅनर स्पष्ट दिसत असून, या प्रकारामुळे झाडांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.
तज्ञांच्या मते, अशा प्रकारे दोरी बांधल्यामुळे “गर्डलिंग इफेक्ट” निर्माण होतो. यामुळे झाडांमधील अन्नद्रव्ये व पाण्याचा प्रवाह अडथळित होऊन झाडांची वाढ खुंटते. तसेच, सालेला इजा होऊन ओलावा साचतो व बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
अमित कुलकर्णी आणि पर्यावरण सेवकांनी या प्रकरणासंदर्भात कारवाई साठीचे निवेदन महापालिकेला दिले असून..
काय आहे निवेदनात :
“महाराष्ट्र झाडांचे जतन (नागरी क्षेत्र) अधिनियम, १९७५” नुसार झाडांना कोणत्याही प्रकारे इजा करणे किंवा त्यांच्या नैसर्गिक वाढीत अडथळा आणणे हा दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे, जरी हा उपक्रम जनजागृतीसाठी असला तरी अशा पद्धतीने झाडांना हानी पोहोचवणे योग्य ठरत नाही.
गंगापूर रोडवरील वडाची झाडे ही शहराचा मौल्यवान नैसर्गिक वारसा असून त्यांचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे.
या आहेत प्रमुख मागण्या :
– झाडांवर बांधलेले सर्व बॅनर्स व दोऱ्या तात्काळ काढण्यात याव्यात.
– संबंधित जबाबदार यंत्रणा/व्यक्तींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.
– भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पर्यावरणपूरक मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करावीत.
प्रशासनाने या गंभीर विषयाची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अश्या प्रकारचे निवेदन केलेले आहे.
अमित कुलकर्णी हे निसर्ग सेवक युवा मंच चे अध्यक्ष असून, खिळे मुक्त अभियानाचे प्रवर्तक देखील आहेत.
इजा पोहचवून वेदना देणे योग्य आहे का?
प्रशासन या निवेदनमार्फत या प्रकरणावर काय कारवाई करणार याकडे सर्व पर्यावरण सेवकांचे लक्ष लागले आहे


