
राष्ट्रीय पिच्याक सिलेंट स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद
नाशिक : छत्रपती संभाजीनगर मार्गावरील जनार्दन स्वामी आश्रमाच्या सर्वेश्वर महादेव ट्रस्टच्या इनडोअर हॉल येथे १४ व्या राष्ट्रीय स्तरीय पिच्याक सिलेंट स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्र राज्याने या स्पर्धेत १४ सुवर्ण, सात रौप्य व १६ कांस्यपदके मिळवून प्रथम क्रमांक मिळवत विजेतेपदाला गवसणी घातली. यामध्ये शौर्य गवांदे याने सुवर्ण पदक मिळविले यासाठी त्याला प्रशिक्षक केतन गुंजाळ आणि नागेश बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले.
इंडियन पिच्याक सिलेंट फेडरेशनच्या मार्गदर्शनाने आयोजित या स्पर्धेत सिंगल, मकान, प्री टिन, सब ज्युनिअर व ज्युनिअर या वयोगटांतील खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये २८ राज्ये व आठ केंद्रशासित प्रदेशांतील 1900 खेळाडू सहभागी झाले. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास इंडियन पिच्याक सिलेंट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले, भोजराज जैन, सचिव तारीख जगर आदी उपस्थित होते. उत्तराखंड राज्याने दुसरा, जम्मू आणि काश्मीर राज्याने तिसरा व ओडिसा राज्याने चौथा क्रमांक पटकावला.
स्पर्धा यशस्वितेसाठी केतन गुंजाळ, निलेश गाडवे, लक्ष्मण दातीर, नागेश बनसोडे, योगेश पानपाटील, आकाश धवडो, धनंजय जगताप, अंशुल काळे, अनुज सरनाईक, संकेत धामणे, सुरेखा येवले, भरत जाधव, गौतम केदार, अमोल कदम, अरविंद शिंदे, अश्विनी राजूत, पल्लवी म्हात्रे, पौर्णिमा तेली यांचे सहकार्य लाभले.




