Welcome to Khabar 24 Live   Click to listen highlighted text! Welcome to Khabar 24 Live
E-Paperगोदावरीचा विकास

नंदिनी पुन्हा “नासार्डी” होण्याच्या मार्गांवर? : पर्यावरण प्रेमी संतप्त

नंदिनी पुन्हा नासार्डी होण्याच्या मार्गांवर? : पर्यावरण प्रेमी संतप्त

नंदिनी नदीपात्रातील सांडपाणी पाईपलाईनला विरोध; आयुक्त व गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी.

नाशिक | प्रतिनिधी
अमृत योजनेअंतर्गत नंदिनी नदीच्या पात्रातून प्रस्तावित सांडपाणी पाईपलाईन टाकण्याच्या कामाला पर्यावरणप्रेमी, निसर्गसेवक आणि स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध होत असून, हे काम तात्काळ स्थगित करण्याची मागणी निसर्गसेवक युवा मंचाचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी केली आहे.

यासंदर्भात अमित कुलकर्णी यांनी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तसेच मा. उच्च न्यायालय आदेशित गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे. निवेदनात नंदिनी नदीच्या पात्रातून सांडपाणी वाहिनी नेण्याचा निर्णय नदी पुनरुज्जीवनाच्या उद्दिष्टांशी विसंगत असल्याचा मुद्दा मांडण्यात आला आहे.

कुलकर्णी यांनी निवेदनात नमूद केले आहे की, नंदिनी नदीचे पुनरुज्जीवन, प्रदूषणमुक्ती आणि पर्यावरणीय संवर्धनासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असताना नदीपात्रात थेट सांडपाणी पाईपलाईन टाकणे हा अत्यंत गंभीर विषय आहे. यामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाह, जैवविविधता आणि भविष्यातील पुनरुज्जीवन प्रक्रियेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

विशेष म्हणजे, नंदिनी नदी ही गोदावरी नदीची महत्त्वाची उपनदी असल्याने या प्रकरणात मा. उच्च न्यायालय आदेशित गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गोदावरी व तिच्या उपनद्यांमधील प्रदूषण नियंत्रण, नदी संवर्धन आणि न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या समितीने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन स्थळ पाहणी करावी व आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच नाशिक महानगरपालिका आयुक्तांनीही या कामासंदर्भातील सर्व तांत्रिक अहवाल, पर्यावरणीय अभ्यास, मंजुरी प्रक्रिया आणि पर्यायी मार्गांचा विचार सार्वजनिक करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

“नंदिनी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी अनेक वर्षांपासून नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरणप्रेमी सातत्याने प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत नदीपात्रातून सांडपाणी पाईपलाईन टाकण्याचा निर्णय हा अत्यंत चिंताजनक आहे. आम्ही सांडपाणी व्यवस्थापनाला विरोध करत नाही; मात्र नदीपात्राचा वापर करून नदीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करणाऱ्या निर्णयाला विरोध करीत आहोत.

अमित कुलकर्णी

-निसर्ग सेवक युवा मंच –

मा. उच्च न्यायालय आदेशित गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त यांनी या विषयात वैयक्तिक लक्ष घालून तातडीने हस्तक्षेप करावा. तसेच नाशिक महानगरपालिका आयुक्तांनी हे काम स्थगित करून संपूर्ण प्रकरणाचा फेरविचार करावा. नंदिनी नदी ही केवळ जलवाहिनी नसून नाशिकच्या पर्यावरणीय भविष्याचा महत्त्वाचा घटक आहे. नदी वाचली तरच भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण मिळेल.”

दरम्यान, प्रशासनाकडून या विषयावर अद्याप अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नसून, पर्यावरणप्रेमी व स्थानिक नागरिकांनी तातडीने खुलासा करण्याची मागणी केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!