नंदिनी नदीच्या संरक्षणासाठी विविध सामाजिक संघटना सरसावल्या
नेहमीच करावे लागणारे आंदोलन ही 'लज्जास्पद' गोष्ट

नाशिक , दि. ११ जुलै : आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नंदिनी नदीचे संरक्षण, नदीपात्रातील सुरू असलेले ड्रेनेज लाईनचे काम तात्काळ थांबविणे तसेच मा. उच्च न्यायालयाच्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या मागण्यांसाठी निसर्गसेवक युवा मंच, नंदिनीप्रेमी व पर्यावरणप्रेमी यांच्या वतीने शनिवारी (दि. ११ जुलै) शांततापूर्ण लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सकाळी १०.३० वाजता श्री म्हसोबा महाराज मंदिराजवळ, सिटी सेंटर मॉल, छत्रपती संभाजी महाराज चौक, नाशिक येथे मोठ्या संख्येने पार पडले.
या आंदोलनाला विविध सामाजिक, पर्यावरणीय व जनहितासाठी कार्यरत संघटनांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. आंदोलनस्थळी मा. विरोधी पक्षनेते सुधाकर भाऊ बडगुजर यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांची दखल घेत पुढील महासभेत हा विषय मांडून संबंधित मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी पर्यावरणप्रेमींनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, पुढील महासभेत त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाला नाही, तर पुढील टप्प्यात नंदिनी नदीपात्रात उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल.
आंदोलनात निसर्गसेवक अमित कुलकर्णी, अनिकेत मंडाले, योगेश गांगुर्डे, शुभम महाले, जगबीर सिंग, देवेंद्र देशपांडे, मनीष बाविस्कर, भारती जाधव, प्रीतम भामरे, विराज आंबेकर, भिकन सुकदेव गवळी, अनिल भापकर, परशुराम जमधडे, रोहित पारख, रत्नाकर औटी, बाळासाहेब मथुरे, सतीश कुलकर्णी, संजू पाटील, सागर बैरागी, निलेश गायकवाड, ज्ञानेश आहेर, कुलदीप कौर, अमित कुशवाह, सुमित शर्मा, किरण कुटुंबळे, अर्चना कुर्विनकोप, धनश्री गिरी, सुयश मेने, हेमंत कमळसकर यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमी सहभागी झाले होते.
या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेना, युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), छावा क्रांतीवीर सेना, निर्भय महाराष्ट्र पार्टी, मुद्राय युवा फाउंडेशन, शारदा सोशल ग्रुप, एकनिष्ठ युवा फाउंडेशन, कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी समर्थ ज्ञानपीठ, सिंहगर्जना वेल्फेअर अँड चॅरिटेबल ट्रस्ट, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, इंटरनॅशनल एन्व्हायर्नमेंट फ्रेंड्स, मानव उत्थान मंच, आरंभ सामाजिक सेवाभावी संस्था, ॐ बजरंग सेवा मंडळ तसेच सिडको ब्राह्मण महासंघ यांनी जाहीर पाठिंबा दिला होता.
आंदोलनाच्या माध्यमातून नंदिनी नदीचे अस्तित्व जपण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
“नंदिनी वाचवा, भविष्य वाचवा” हा संदेश देत आंदोलनाची सांगता करण्यात आली.
यावेळी निसर्गसेवक युवा मंचाचे अध्यक्ष निसर्गसेवक अमित कुलकर्णी म्हणाले, “नंदिनी नदीचे संरक्षण ही काळाची गरज आहे. नदीपात्रातील ड्रेनेज लाईनचे काम तात्काळ थांबवून उच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करावी. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास पुढील टप्प्यात नदीपात्रात उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल.”




