E-Paper

धरणगाव तालुक्यात कृषी कार्यालय उभारण्याची मागणी

भाड्याचे कृषी कार्यालय हटवून सर्व सोयीयुक्त नवीन अद्यावत कार्यालय उभारण्यासाठी बळीराजाचे प्रशासनास साकडे

धरणगाव प्रतिनिधी : धरणगाव शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी तालुका कार्यालय ही अत्यंत अत्यावश्यक गरज बनली आहे.
आजही धरणगावमधील कृषी कार्यालय भाड्याच्या इमारतीत चालत असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कार्यालयात जागेची मोठी कमतरता असून, दूरदूरच्या गावांतून येणाऱ्या शेतकऱ्यांना बसायला तर सोडाच, उभे राहण्यासाठीसुद्धा पुरेशी जागा उपलब्ध नसते. ही परिस्थिती अत्यंत दुर्दैवी व शेतकऱ्यांसाठी त्रासदायक आहे.
धरणगाव तालुका हा पूर्णपणे शेतीप्रधान असून येथे कापूस, केळी, मका, ज्वारी तसेच विविध भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. बदलत्या काळात शेती अधिक आधुनिक व उत्पादनक्षम करण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन, माती परीक्षण, खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण याबाबत अद्ययावत माहिती मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
जर धरणगावमध्ये स्वतंत्र, प्रशस्त व सुसज्ज कृषी तालुका कार्यालयाची भव्य इमारत उभारण्यात आली, तर त्यामध्ये अत्याधुनिक माती परीक्षण प्रयोगशाळा, शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण हॉल, माहिती व मार्गदर्शन केंद्र तसेच प्रशासकीय विभाग एकाच छताखाली व्यवस्थित रित्या उभारता येतील. यामुळे शेतकऱ्यांना सर्व सेवा एकाच ठिकाणी, जलद व सुलभ पद्धतीने उपलब्ध होतील. त्यांचा वेळ वाचेल, खर्च कमी होईल आणि शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढेल.
यासोबतच धरणगाव परिसरातून मोठ्या प्रमाणावर कृषी मालाची वाहतूक होत असल्याने, वाहतूक सुविधांचा विस्तार करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. रस्ते, गोदामे, बाजारपेठ व लॉजिस्टिक सुविधा विकसित झाल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळेल तसेच प्रवाशांनाही मोठा फायदा होईल. यामुळे संपूर्ण परिसराच्या आर्थिक विकासाला गती मिळेल.
म्हणूनच धरणगाव शहरातील लोकप्रतिनिधी, आमदार व खासदार यांनी या अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वतंत्र व भव्य कृषी तालुका कार्यालय उभारण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, ही सर्व धरणगावकरांची अपेक्षा आहे.
धरणगावच्या सर्वांगीण विकासासाठी, शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रशासनाने आता तात्काळ जागे होणे अत्यंत गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!