कुंभमेळ्याच्या निधीचा ‘शाश्वत’ वापर करा – सुरेश आव्हाड यांनी घेतली महापौरांची भेट.
लवकरात लवकर रस्त्यांची कामे मार्गी लावावी.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पायाभूत सुविधांकडे लक्ष द्या; लवकरात लवकर रस्त्यांची कामे मार्गी लावावी.
नाशिक (प्रतिनिधी) : येऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार असल्याने हा निधी ‘शाश्वत’ विकासकामांवर खर्च करण्यात यावा, अशी मागणी करत विविध नागरी समस्यांबाबत महापौरांकडे निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनात शहराला दिवसातून दोन वेळा मुबलक पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच रायजिंग लाईन वाढवून जलकुंभांची कामे तातडीने पूर्ण करावीत, जेणेकरून प्रभाग क्रमांक ६ मधील भगवान बाबा नगर, इंद्रप्रस्थ कॉलनी, सत्यदेव नगर, महादेव कॉलनी, विद्या नगर, मनपा कॉलनी, तांबे मळा, वडजाई माता नगर, घाडगे मळा, अश्वमेध नगर, मेहेरधाम आदी परिसरांमध्ये नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होईल.
सध्या नाशिक शहरातील अनेक भागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून काही ठिकाणी केवळ एक वेळ आणि मर्यादित कालावधीसाठीच पाणी दिले जात आहे. असे असताना नागरिकांना अंदाजे व सरासरी पाणीबिले पाठवली जात असल्याचा आरोप करण्यात आला असून ही बिले बेकायदेशीर व सदोष असल्याने ती तातडीने मागे घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच मखमलाबाद हा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून खोदून ठेवलेला असून त्याचे काम त्वरित मार्गी लावावे. श्री मंगल ड्रायव्हिंग स्कूल ते पवार मळा या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावर वारंवार अपघात होऊन नागरिकांचा जीव जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हा रस्ता तातडीने नव्याने काँक्रीट करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय श्रीकृष्ण नगर, मोरे मळा, काकड बाग, सत्यदेव नगर, गजवक्र नगर या परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण व खडीकरण करण्यात यावे. तसेच आडगाव येथील पोलिस वसाहत मध्ये पाण्याची नवीन लाइन टाकण्यात यावी.तसेच क्रांतीनगर,उदय कॉलनी,हनुमानवाडी येथे गतिरोधक टाकण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्हाध्यक्ष ऍड. सुरेश आव्हाड यांनी महापौर हिमगौरी आहेर आडके यांची भेट घेऊन हे निवेदन सादर केले असून लवकरात लवकर ठोस निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.



