Welcome to Khabar 24 Live   Click to listen highlighted text! Welcome to Khabar 24 Live
E-Paperएज्यूकेशनदेश

शिक्षणाच्या मंदिरातील भ्रष्टाचार : देशाच्या भवितव्याला लागलेली कीड

शिक्षणाच्या मंदिरातील भ्रष्टाचार : देशाच्या भवितव्याला लागलेली कीड.

जेष्ठ पत्रकार डॉ. दिलीप के. कोठावदे (नाशिक)

भारतामध्ये सध्या गाजत असलेले नीट परीक्षेतील भ्रष्टाचार प्रकरण हे केवळ एका परीक्षेपुरते मर्यादित नसून, संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या पाया हादरवणारे भीषण वास्तव आहे.
दररोज नवीन आरोपी समोर येत आहेत, मोठमोठी नावे उघड होत आहेत, अटकसत्र सुरू आहे… आणि या सर्व घडामोडींनी देशातील प्रत्येक प्रामाणिक विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांची मान शर्मेने खाली झुकली आहे.

शिक्षण हे भारतीय संस्कृतीत “पवित्र क्षेत्र” मानले गेले.
गुरु-शिष्य परंपरेतून संस्कार, प्रामाणिकपणा आणि ज्ञानाची पूजा केली गेली.
परंतु आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, ज्ञानापेक्षा पैसा मोठा ठरत आहे, गुणवत्तेपेक्षा ‘व्यवस्था’ महत्त्वाची बनत आहे आणि मेहनतीपेक्षा ‘जुगाड’ यश मिळवून देत आहे.
ही स्थिती अत्यंत भयावह आहे.

आज शाळा आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक महत्त्व जाणीवपूर्वक कमी केले जात आहे आणि दुसरीकडे कोचिंग क्लासेसचे अवास्तव साम्राज्य उभे राहत आहे.
विद्यार्थ्यांचे बालपण, मानसिक स्वास्थ्य आणि नैतिक मूल्ये या व्यावसायिक स्पर्धेत अक्षरशः चिरडली जात आहेत.
अनेक ठिकाणी शिक्षण हा “सेवा” विषय न राहता कोट्यवधींचा “व्यवसाय” बनला आहे.

कोचिंग क्लासेसच्या वाढत्या प्रभावामुळे शिक्षण व्यवस्थेमध्ये गंभीर असमतोल निर्माण झाला आहे.
शाळांमध्ये शिकवले जाणारे शिक्षण अपुरे ठरावे, विद्यार्थ्यांनी क्लासेसकडेच धाव घ्यावी, पालक आर्थिक ओझ्याखाली दबावेत आणि शिक्षण पूर्णपणे बाजारपेठेच्या ताब्यात जावे — अशी विकृत व्यवस्था नकळत उभी राहत आहे.
ही परिस्थिती भविष्यात देशासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते.

यासाठी आता केंद्र आणि राज्य सरकारांनी केवळ चौकशी किंवा अटकसत्रांपुरती मर्यादित भूमिका न घेता अत्यंत कठोर, व्यापक आणि दीर्घकालीन धोरण स्वीकारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

परीक्षा पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करणे, पेपरफुटी आणि गैरव्यवहार करणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद करणे, कोचिंग क्लासेसवर नियंत्रण आणणे, त्यांच्यासाठी स्पष्ट नियमावली आणि मर्यादा निश्चित करणे, शिक्षण क्षेत्रातील राजकीय हस्तक्षेप कमी करणे आणि विशेषतः राजकारण्यांच्या शिक्षण संस्थांवरील सवलती व अनुदानांचा पुनर्विचार करणे — ही काळाची गरज बनली आहे.

आज अनेक शिक्षण संस्था या “ज्ञानमंदिर” म्हणून नव्हे तर “राजकीय आणि आर्थिक केंद्रे” म्हणून कार्यरत असल्याची जनमानसात भावना निर्माण होत आहे.
ही भावना लोकशाहीसाठी आणि शिक्षण व्यवस्थेसाठी अत्यंत घातक आहे.

जर आजही ठोस आणि कठोर निर्णय घेतले गेले नाहीत, तर उद्याच्या पिढीचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कायमचा उडेल.
मेहनती विद्यार्थ्यांच्या मनात अन्यायाची भावना वाढेल आणि समाजात नैतिक अध:पतन अधिक तीव्र होईल.

भ्रष्टाचाराची ही कीड केवळ एका परीक्षेपुरती मर्यादित नाही; ती संपूर्ण व्यवस्थेला पोखरत आहे.
ती वेळीच समूळ नष्ट करणे ही केवळ सरकारचीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक सजग नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे.

 

कारण…
शिक्षण वाचले तरच देश वाचेल.
आणि शिक्षण पवित्र राहिले तरच भारताचे भविष्य सुरक्षित राहील.

लेखक :- पत्रकार, डॉ.दिलीप कोठावदे, नाशिक
9657562911

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!