नंदिनी नदीपात्रातील सांडपाणी पाईपलाईन कामाबाबत मनपाच्या उत्तरावर पर्यावरणप्रेमींची हरकत.
उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप

नाशिक, दि. २९-०६-२०२६ : नंदिनी नदीपात्रातून सुरू असलेल्या सांडपाणी पाईपलाईन व आर.सी.सी. चेंबर बांधकामाबाबत नाशिक महानगरपालिकेकडून प्राप्त झालेल्या उत्तरावर निसर्गसेवक युवा मंचाने गंभीर हरकती नोंदवून मा. विभागीय आयुक्त तथा उच्च न्यायालय आदेशित गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीचे अध्यक्ष, मा. आयुक्त, नाशिक महानगरपालिका तसेच संबंधित विभागांकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे.
निसर्गसेवक युवा मंचाचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी सांगितले की, महानगरपालिकेच्या उत्तरामध्ये नदीपात्रातील विद्यमान विटांचे चेंबर पाडून त्याऐवजी आर.सी.सी. चेंबर उभारण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्ष स्थळ पाहणीदरम्यान विद्यमान विटांचे चेंबर कायम ठेवून नदीपात्रात नवीन आर.सी.सी. चेंबर उभारण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या उत्तरातील माहिती आणि प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामामध्ये स्पष्ट विसंगती असल्याचा मुद्दा निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.
निवेदनामध्ये नदीपात्रातूनच सांडपाणी वाहिनी टाकण्याची आवश्यकता, पर्यायी मार्गांचा अभ्यास, पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन (EIA), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व इतर सक्षम प्राधिकरणांच्या मंजुरी, तांत्रिक अहवाल, मंजूर आराखडे, कार्यादेश आणि इतर संबंधित कागदपत्रांची प्रमाणित प्रत उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, मा. उच्च न्यायालयाच्या नदीपात्रात कायमस्वरूपी बांधकाम न करण्यासंदर्भातील आदेशांच्या पार्श्वभूमीवर नंदिनी नदीपात्रात सुरू असलेले आर.सी.सी. चेंबर बांधकाम नेमक्या कोणत्या सक्षम प्राधिकरणाच्या मंजुरीने सुरू आहे, तसेच या कामासाठी मा. उच्च न्यायालयाची अथवा इतर संबंधित प्राधिकरणाची आवश्यक परवानगी घेण्यात आली आहे का, याबाबत अधिकृत माहिती आणि मंजुरीपत्रे सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नदीपात्रातील कामांबाबत ‘नीरी’ (NEERI) संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले आहे का, याबाबतही स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. विशेषतः, सांडपाणी वाहिनी निळ्या पूररेषेच्या बाहेर नेण्याबाबतच्या सूचनांचा विचार करण्यात आला होता का आणि तरीही नदीपात्रातच काम करण्यामागील तांत्रिक कारणे कोणती, याबाबतचा सविस्तर अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निसर्गसेवक युवा मंचाने संबंधित सर्व माहिती व प्रमाणित कागदपत्रे ७ दिवसांच्या आत उपलब्ध करून देण्याची मागणी केली असून, अन्यथा उपलब्ध सर्व कायदेशीर उपायांचा अवलंब करण्यात येईल. तसेच नंदिनी नदीच्या संरक्षणासाठी नाशिकमधील पर्यावरणप्रेमी, विविध सामाजिक संस्था व सर्वसामान्य नागरिकांच्या सहभागातून लोकशाही मार्गाने व्यापक व तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी अमित कुलकर्णी यांनी सांगितले की,
“नंदिनी नदी ही नाशिकच्या पर्यावरणीय आणि सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. नदीपात्रातील कोणतेही काम पूर्ण पारदर्शकतेने, न्यायालयीन आदेशांचे पालन करून आणि पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करतच झाले पाहिजे. आम्ही विकासाच्या विरोधात नाही; मात्र नदीचे अस्तित्व धोक्यात आणणाऱ्या कोणत्याही निर्णयाला ठामपणे विरोध करू.




