Welcome to Khabar 24 Live   Click to listen highlighted text! Welcome to Khabar 24 Live
E-Paperयुवा

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!”

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!”

डॉ. पराग मसराम यांच्या संवेदनशील कृतीने जिंकली कर्मचाऱ्यांची मने; सेवेला दिला कृतज्ञतेचा अनोखा सन्मान

शासकीय सेवेत उच्च पदावर कार्यरत असताना अधिकार, जबाबदारी आणि प्रशासकीय कौशल्य यांना महत्त्व असतेच; परंतु त्या पदासोबत माणुसकी, संवेदनशीलता आणि सहकाऱ्यांप्रती कृतज्ञतेची भावना जपणारे अधिकारी समाजात वेगळा आदर्श निर्माण करतात. अशीच एक हृदयस्पर्शी घटना नुकतीच जळगाव येथे घडली आणि उपस्थितांच्या मनावर कायमचा ठसा उमटवून गेली.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ क्षेत्रातील माननीय सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, जळगाव यांच्या कार्यालयातील प्रशासकीय वाहन चालक श्री. रवींद्र दौलतराव पवार यांनी दिनांक १ जून २०२६ रोजी नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून निवृत्ती स्वीकारली. अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या या कर्मचाऱ्याला कार्यालयामार्फत भावपूर्ण निरोप देण्यात आला. सहकारी, अधिकारी आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत झालेला हा समारंभ अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला.

मात्र या कार्यक्रमानंतर घडलेली घटना सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली. सहसंचालक कार्यालयाचे प्रमुख डॉ. पराग मसराम यांनी पदाचा मोठेपणा बाजूला ठेवत आपल्या सेवापूर्ती झालेल्या वाहन चालकाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा अनोखा मार्ग निवडला. अनेक वर्षे आपल्या कार्यालयासाठी वाहन चालवणाऱ्या कर्मचाऱ्याच्या सेवेला मानवंदना देण्यासाठी त्यांनी स्वतः प्रशासकीय वाहनाचे स्टेअरिंग हाती घेतले आणि श्री. पवार तसेच त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या निवासस्थानी सुखरूप पोहोचविले.

ही केवळ एक औपचारिक कृती नव्हती; ती होती सहकाऱ्याविषयीच्या आदराची, जिव्हाळ्याची आणि कृतज्ञतेची प्रांजळ अभिव्यक्ती. त्या क्षणी ते केवळ वरिष्ठ अधिकारी नव्हते, तर आपल्या सहकाऱ्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्याचे साक्षीदार असलेले एक संवेदनशील माणूस होते.

विशेष म्हणजे, असाच प्रेरणादायी आदर्श यापूर्वी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. महेश्वरी यांनीही घालून दिला होता. आपल्या वाहन चालकाच्या सेवापूर्तीप्रसंगी त्यांनी स्वतः वाहन चालवत त्या कर्मचाऱ्याला व त्यांच्या कुटुंबीयांना घरी पोहोचवून मानवी नात्यांचा सन्मान जपला होता. पद, प्रतिष्ठा आणि अधिकार यापलीकडे जाऊन सहकाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करण्याची ही भावना खऱ्या नेतृत्वाचे दर्शन घडवणारी आहे.

आजच्या स्पर्धात्मक आणि यांत्रिक होत चाललेल्या काळात अशा घटना समाजाला सकारात्मक संदेश देतात. नेतृत्व म्हणजे केवळ आदेश देणे नव्हे, तर आपल्या सहकाऱ्यांच्या योगदानाची जाणीव ठेवून त्यांचा सन्मान करणे होय. अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातील परस्पर आदर, विश्वास आणि आत्मीयता यामुळेच कोणतीही संस्था अधिक सक्षम आणि यशस्वी बनते.

अशा कृतींमधून प्रशासनातील मानवी चेहरा समाजासमोर येतो. पदाचा अधिकार क्षणिक असतो; परंतु माणुसकीतून केलेली कृती कायम स्मरणात राहते. त्यामुळेच समाज अशा अधिकाऱ्यांकडे केवळ प्रशासकीय प्रमुख म्हणून नव्हे, तर प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून पाहतो.

खरोखरच, पद मोठे असणे महत्त्वाचे नाही; तर त्या पदाला माणुसकीची उंची प्राप्त करून देणे अधिक महत्त्वाचे असते.

अधिकारी असावा तर असाच…!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!