आयुक्त्यांच्या राजीनाम्याची मागणी; उद्या नाशिककर काढणार ‘खड्ड्यांची वारी’
प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध

नाशिक प्रतिनिधी : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाच्या नावाखाली शहरभर मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले. प्रशासनाकडून रस्ते सुस्थितीत असल्याचा दावा केला जात असला तरी पावसाळ्यात हेच रस्ते नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत.
नागरिकांसाठी अक्षरश: मृत्यूचे सापळे ठरत आहेत. वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. शासनाने पंधरा दिवसांत खड्डे बुजविण्याचे आदेश दिले असतानाही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने संताप वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट अजिंक्य गीते यांच्या नेतृत्वाखाली ‘खड्ड्यांची वारी’ हा उपरोधिक उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेत शहरातील प्रत्येक खड्ड्याजवळ जाऊन प्रतीकात्मक वारी काढली जाणार असून खड्ड्यांचे छायाचित्रण करून ते महापालिका प्रशासनाला सादर केले जाणार आहे. ‘आपणच आमचे पांडुरंग आहात, आम्हाला सुरक्षित रस्त्यांचा मार्ग दाखवा,’ या उपरोधिक संकल्पनेतून प्रशासनालाच ‘पांडुरंग’ मानत नागरिक आपला संताप व्यक्त करणार आहेत. उद्या 1 ऑगस्ट रोजी होण्याऱ्या आंदोलनात शहरातील नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासन जागे होणार का?
रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे झालेल्या अपघातांत अलीकडेच चौघांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. आता तरी प्रशासन जागे होणार का? की ‘खड्ड्यांची वारी’च शहराची नवी ओळख बनणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

खड्डेमय रस्ते, वारंवार होणारे अपघात आणि प्रशासनाची सातत्याने होत असलेली दुर्लक्षाची भूमिका याविरोधात आता नाशिककरांनी अनोखा मार्ग निवडला आहे. ‘खड्ड्यांची वारी’ या उपरोधिक आंदोलनातून महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचा निर्णय काही कार्यकर्त्यांनी घेतला आहे.



