पाणवेली, जलपर्णी हटवा, अन्यथा १ जुलैपासून बेमुदत उपोषण
गोदामाई स्वच्छता कृती समितीचा मनपाला इशारा
नाशिक : पंचवटीतील अहिल्यादेवी होळकर पूल ते रामवाडी पुलादरम्यान गोदावरी नदीकिनाऱ्यावर साचलेल्या पाणवेली आणि जलपर्णीचा कचरा त्वरित न काढल्यास येत्या १ जुलैपासून महापालिकेसमोर बेमुदत उपोषणाचा इशारा गोदामाई स्वच्छता कृती समितीचे दत्तू बोडके यांनी दिला आहे. यासंदर्भात आयुक्तांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे.
महापालिका ‘ट्रॅश स्किमर’ मशीनच्या साहाय्याने गोदावरी नदीपात्रातील पाणवेली व जलपर्णी हटविण्याचे काम करते. मात्र जलपर्णी नियमितपणे वाढत आहे. पाणवेलीमुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असून जलचर मृत होत आहेत. तसेच नदीचा नैसर्गिक प्रवाहदेखील अडवला जात आहे. परिसरात दुर्गंधी पसरली असून, पात्रालगतच्या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना नाक दाबून प्रवास करावा लागत आहे.
‘स्वच्छ नाशिक – सुंदर नाशिक’
ही घोषणा फक्त कागदावरच राहिल्याची टीका निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर दत्तू बोडके, श्याम गोसावी, वैभव देशमुख, मुकेश गांगुर्डे, रूपेश परदेशी, हर्षिका डापसे, जगन कायडे, विवेक चव्हाण, वैभव रोकडे आणि प्रीतेश बागुल यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
आंदोलनकांच्या मुख्य मागण्या
अहिल्यादेवी होळकर – रामवाडी पुलादरम्यान सात दिवसांत जेसीबी, मनुष्यबळ लावून त्वरित कचरा हटवावा.
महापालिकेने कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी.
कचरा काढण्याचा दैनिक अहवाल प्रसिद्ध करावा.




